No drought if watersheds developed – CM Fadnavis

Share this News:

पाणलोटांचा विकास केला तर कधीही दुष्काळ पडणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी घेतले हलगरा गाव दत्तक
राष्ट्रभक्तीने काम केल्यास राज्य दुष्काळमुक्त होईल

लातूर : राज्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाणलोटांचा विकास करणे गरजेचे आहे. राज्यातील पाणलोटांचा विकास केला तर राज्यात कधीही दुष्काळ पडणार नसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलगरा येथे केले.

निलंगा तालुक्यातील हलगरा येथे आयोजित श्रमदान कार्यक्रमानंतर शिवार संवाद अंतर्गत शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, खासदार डॉ.सुनील गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड आदी उपस्थित होते.

हलगरा गावातील गावकऱ्यांनी लोकसहभागातून केलेल्या जलयुक्त शिवारांच्या कामांची स्तुती करताना मुख्यमंत्री म्हणाले की, विविध योजना राबवून राळेगणसिद्धी ज्याप्रमाणे स्वयंपूर्ण बनले आहे त्याचप्रमाणे हलगरा गावही स्वयंपूर्ण बनले पाहिजे. चित्रपटातला नायक काही मिनिटात गावाचे चित्र पालटतो पण ते काल्पनिक असते. मात्र तुम्ही एकत्र येऊन जे जलयुक्त शिवाराचे काम केले आहे ते पाहता तुम्ही सर्व हिरो आहात आणि तेही खरे हिरो आहात. गावकऱ्यांचे हे काम पाहून मी हलगरा हे गाव दत्तक घेत असून या गावात सर्व योजना पोहोचवणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पाण्याच्या महत्वाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे पाणी तिथे संस्कृती असते. पाणी संपले की संस्कृतीचा नाश होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पाण्याचे महत्व ओळखून प्रत्येक किल्ल्यात पाण्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी अनेक मोठ्या धरणांची निर्मिती केली. परंतु हे धरणे बांधत असतानाच त्यांनी जलसंधारणाच्या कामांना देखील प्राधान्य दिले होते. यावरुन आपणाला पाण्याच्या एका थेंबाचे देखील महत्व कळायला पाहिजे. पाण्याचा एक एक थेंब माझ्या गावात अडवून तो जमिनीत मुरवणार आणि गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी करणार असा गावकऱ्यांनी संकल्प केला पाहिजे. जल स्वातंत्र्याच्या लढाईत सर्वजण एकत्र आले पाहिजे. देशात जेवढी मोठी धरणे आहेत, त्यापैकी 40 टक्के धरणे ही राज्यात आहेत. मात्र तरीही राज्यातील 80 टक्के शेती ही कोरडवाहू आहे. राज्यातील दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे, त्यामुळे जलयुक्त शिवारांची मोठ्या प्रमाणात कामे होणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी जलसंधारणाच्या अनेक योजना राबविल्या जात होत्या. मात्र आता 14 योजना एकत्र करुन जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना यशस्वी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे लोकसहभाग. कोणतीही योजना लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. राज्यात वॉटर कपच्या माध्यमातून आणि नाम या संस्थेच्या माध्यमातून जलयुक्त शिवारांची अनेक कामे करण्यात आली आहेत. हलगरा गावातील दत्ता पाटील हे स्वत: अमेरिकेत असताना देखील त्यांचा गावाच्या विकासाचा ध्यास खरंच वाखाणण्याजोगा आहे. अनेक बाबतीत लातून पॅटर्न देणाऱ्या लातूरने जलयुक्त शिवाराच्या बाबतीत देखील नवीन हलगरा पॅटर्न अस्तित्वात आला असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गावकऱ्यांच्या श्रमदानाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी गावकऱ्यांनी डीजेचा वापर न करता श्रमदानातून जलयुक्तचे केलेले काम खरंच कौतुकास्पद आहे. गावकऱ्यांनी आता गट शेती या योजनेचा देखील लाभ घ्यावा आणि गावाचा विकास करावा. 20 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन किमान 100 एकर जमिनीच्या आधारे गट निर्माण करावा. गट शेतीच्या माध्यमातून त्या गावाला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देता येतील. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे एकट्या शेतकऱ्याला परवडणारे नाही, त्यामुळे गट शेतीच्या माध्यमातून सर्वांना एकत्रितपणे अत्याधुनिक साधनांचा उपयोग करणे शक्य होईल आणि जेणेकरुन शेतीचे उत्पादन वाढेल. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सकस असा गाळ आपल्या शेतीत टाकावा जेणेकरुन पाण्याचे स्त्रोत मोकळे होतील आणि शेतीसाठी त्या गाळाचा फायदा होईल. शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याचे सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे न परवडणारा हमी भाव होय. हमी भाव न परवडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे उत्पादकता कमी असणे हे होय, यासाठी उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पाटील-निलंगेकर म्हणाले की, जलयुक्त शिवाराचे काम करण्याचा ध्यास घेतलेले गावकरी गेली 45 दिवस श्रमदानाच्या माध्यमातून हे काम करत आहेत. आपण टंचाईची समस्या निर्माण झाल्यास प्रयत्न करतो पण पाऊस आल्यावर सर्व विसरून जातो. आता गावकऱ्यांनी यापुढे पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवाराच्या यशस्वी गाथेविषयी योगेश या गावकऱ्याने आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, 26 जानेवारी रोजी आम्ही जलयुक्त शिवाराचे काम सुरू केले. आतापर्यंत अडीच लाख टन गाळ उपसला आणि सुमारे पाच किलोमीटर लांबीचे नाल्याचे काम पूर्ण झाले. या कामासाठी पालकमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी दिला. या नाल्याच्या माध्यमातून सुमारे 20 हजार घनमीटर काम झाले आहे. याअंतर्गत तीन गॅबीयन बंधारे बांधले. शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी गावकऱ्यांनी श्रमदान करुन 10 हजार घनमीटरचा बंधारा बांधला. विशेष म्हणजे वॉटर कप या स्पर्धेत भाग घेण्यासाठी केवळ 24 तास राहिले असताना आम्ही या 24 तासात गावकऱ्यांच्या मदतीने एक बंधारा बांधला आणि या बंधाऱ्याच्या माध्यमातून पाच हजार घनमीटर पाणी थांबणार असल्याचेही गावकऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे श्रमदान आणि न्याहरी

हलगरा येथे आज मुख्यमंत्री येणार म्हणून श्रमदान करणारे ग्रामस्थ नव्हते ते तर गेली 45 दिवस सतत श्रमदान करुन गावच्या शिवारातील पाणी अडविण्यासाठी तळमळीने काम करणारे गावकरी होते. याच गावकऱ्यात आज आणखी एक नाव जोडलं गेलं हे नाव एखाद्या साध्या माणसाचं नव्हतं तर चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होतं. आज सकाळी-सकाळी निलंगा तालुक्यातील हलगरा येथे मुख्यमंत्र्यांनी हे श्रमदान करुन उपस्थितांमध्ये सहजपणे सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस हे हलगरा येथे येताच सर्वप्रथम श्रमदानाच्या ठिकाणाकडे वळले. मुख्यमंत्र्यांनी आल्या आल्या हातात फावडे आणि टोपले घेऊन श्रमदानाला सुरूवात केली. केवळ हातात फावडे घेऊन फोटोपुरते श्रमदान न करता मुख्यमंत्र्यांनी तब्बल 20 ते 25 मिनिटे श्रमदान केले. मुख्यमंत्री महोदयांनी फावड्याने 1 ते 2 फुट खोदले आणि निघालेली माती स्वत: उचलून बांधावर टाकली. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री नंतर श्रमदान करणाऱ्यात सहभागी झाले. त्यांच्यासोबतही श्रमदानही केले. त्यांच्याशी संवाद साधला. शिवार संवाद कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महोदयांनी गावकऱ्यांसोबत बाजेवर बसून गरम गरम न्याहरीचा आस्वाद घेतला. न्याहरीमध्ये प्रसिद्ध असा ‘निलंगा राईस’ आणि ‘सुशिला’ हा पदार्थ त्यांनी चवीने खाल्ला. राज्याचा मुख्यमंत्री आमच्या शेतात येऊन न्याहरी करतो हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याच्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.