लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडकडून महिलांसाठी ई-टॉयलेट, शाळांना ‘स्मार्ट बोर्ड’

Share this News:
डेक्कन कॉर्नर येथे पहिल्या ई-टॉयलेटचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन
पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्याकडून महिलांसाठी शहरात १० ई-टॉयलेट आणि १०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड (इंटरॅक्टिव्ह) बसविण्यात येणार आहेत. त्यातील पहिले ई-टॉयलेट डेक्कन कॉर्नर येथे येत्या मंगळवारी (दि. १७) बसविण्यात येणार आहे. या ई-टॉयलेटचे उद्घाटन दुपारी १.३० वाजता पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते होणार आहे. लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, शोभा धारिवाल आदी प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल द्वारका जालान, क्लबचे सचिव राजीव अगरवाल, सहसचिव सुनील शहा, कोषाध्यक्ष संजय डागा व डिस्ट्रीकट चेअरपर्सन सिग्नेचर प्रोजक्ट श्याम खंडेलवाल आदी उपस्थित होते.
विजय भंडारी म्हणाले, “यंदा क्लबच्या वतीने शिक्षणाचा दर्जा उंचावणे, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण यावर भर दिला जाणार आहे. त्याअंतर्गत १०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड बसविण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिकेच्या शाळा आणि खासगी विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. स्मार्ट बोर्डबरोबरच अभ्यासक्रमही दिला जाणार आहे. या एका संचाची किमंत साधारणपणे अडीच लाख इतकी असून जवळपास या उपक्रमावर अडीच कोटी निधी खर्च केला जाणार आहे. सकाळी १० वाजता ऍड. एस. के. जैन, उद्योजक कृष्णकुमार गोयल प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते स्मार्ट बोर्ड बसविण्यात येतील. त्यासह २० शाळांत सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजल यंत्र, कचरा व्यवस्थापनासाठी ७०० कचरापेट्या देण्यात येणार आहेत. व्ही. एस. सातव हायस्कुल, श्री संत तुकाराम विद्यालय,श्री वाघेश्वर विद्यालय, टी. डी. पाठारे विद्यालय, लोणकर माध्यमिक विद्यालय आणि खडकी एज्युकेशन सोसायटी यांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप होणार आहे. तसेच खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते हडपसरमधील उद्यानाचे सुशोभीकरण केले जाणार आहे.”
“शहरवस्तीत महिलांना स्वच्छतागृहाची होणारी अडचण लक्षात घेऊन १५ लाख रुपये किमतीची १० ई-टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जवळपास दीड कोटीं खर्च होणार आहे. येथे एक व्यक्ती नेमला जाणार आहे. त्यामुळे त्याला रोजगारही मिळेल आणि ई-टॉयलेटची देखभाल व्यवस्थित होईल. वर्दळीच्या ठिकाणी ही ई-टॉयलेट महापालिकेच्या सहकार्याने बसविली जाणार आहेत. याशिवाय येत्या वर्षात प्रौढ, सुरक्षा शिक्षण, दहा हजार चष्म्याचे वाटप, नेत्र तपासणी शिबीर घेतली जाणार आहेत,” असे विजय भंडारी यांनी नमूद केले.
राजीव अगरवाल म्हणाले, “लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड गेली ३० वर्ष उल्लेखनीय सामाजिक कार्य करीत आहे. पूना हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल आणि संजीवन हॉस्पिटल येथे २१ डायलिसिस मशिन्स उभारल्या असून, त्याद्वारे अवघ्या ५०० रुपयात डायलिसिस करून दिले जाते. गरजू आणि आर्थिक मागास रुग्णांना मोफत डायलिसिसचीही सोय आहे. शालेय मुलांना गणवेश वाटप, वृक्षारोपण, वृद्धसेवा असे अनेक सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविले जात आहेत.”