‘जॉबफेअर’मुळे तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध

Share this News:

पुणे : सगळीकडे मंदीची चर्चा सुरु असताना शहरात झालेल्या ‘जॉबफेअर’मुळे तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व ‘फ्रेशर्सजॉबफेअर’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या रोजगार मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. ४५ पेक्षा जास्त राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जवळपास एक हजार फ्रेशर व अनुभवी तरुणांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये पुण्यासह कोल्हापूर-सांगली, नागपूर, सोलापूरसह राज्याच्या विविध भागातून आणि झारखंड, जबलपूर आदी ठिकाणांवरून हे उमेदवार आले होते.

 

सूर्यदत्ता शिक्षण संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये हा रोजगार मेळावा आयोजिला होता. सकाळी ७.३० वाजल्यापासून उमेदवार मुलाखतींसाठी रांगेत उभे होते. दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे सल्लागार सचिन इटकर, भाजप नेते किरण दगडे पाटील, ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, संचालक शैलेश कासंडे, कॅप्टन शालिनी नायर, ‘फ्रेशर्सजॉबफेअर’चे श्रीधर गुटी आदी उपस्थित होते. पदवीधर, बीई, बीटेक, फार्मसी, आयटीआय, डिप्लोमाच्या केलेल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. विशेष म्हणजे कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना रोजगार मेळाव्यात सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. यातून साधारणपणे २५० मुलांना १२ ते ४० हजारपर्यंतची नोकरी मिळणार आहे.

 

अनेकांनी दोन-तीन कंपन्यांसाठी मुलाखती देत एकाच छताखाली नोकरीचे पर्याय उपलब्ध झाल्याचे सांगितले. दौंड येथून आलेला ज्ञानेश्वर जाधव म्हणाला, “याच वर्षी माझे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झाले आहे. कॅम्पसमध्ये मुलाखती झाल्या होत्या. मात्र, मनासारखी नोकरी मिळाली नव्हती. इथे माझ्याशी संबंधित ८-१० कंपन्या आहेत. त्यांच्याकडे अर्ज दिले असून, मला मुलाखतीसाठी बोलावले आहे. जॉबफेअरमुळे मला चांगली संधी मिळेल, अशी आशा आहे.”

 

झारखंडावरून आलेली संगीताकुमारी म्हणाली, माझे बीटेक झाले आहे. जॉबफेअरची माहिती ऑनलाइन मिळाली. विविध कंपन्या सहभागी होणार असल्याने येथे आले. तीन-चार मुलाखती दिल्या आहेत. चांगली नोकरी मिळेल, असा विश्वास वाटतो. नागपूरचा अमित रॉय म्हणाला की, बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुलाखती देण्याची संधी मिळाली. बँकिंग क्षेत्रात चांगली नोकरी मिळेल. एकाच ठिकाणी सगळ्या कंपन्या असल्याने मुलाखती देण्यासाठी पर्याय होते.

————————-
चौकट १
या कंपन्यांमध्ये मिळणार नोकरी
एचआर, फायनान्स, सेल्स, आयटी, डेव्हलपर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, बीपीओ , केपीओ आदी पदांसाठी या मुलाखती झाल्या. इन्फोसिस, एचसीएल, ऍक्सिस बँक, जिंदाल इलेक्ट्रिक, एनआयआयटी, रिलायन्स, एच. आर. ग्लोबल, टी.एस. कन्सलटिंग, टाटा स्ट्रीव्ह सस्टेनेबिलिटी, युरेका फोर्ब्स, करियर मेनेजमेंट (परदेशातील नोकरीसाठी), पाईपटेक इंजिनिअरिंग, एजीज प्रायव्हेट लिमिटेड, क्रिशरूट, लेबरनेट, करिअर एक्स्पर्ट, प्युअरस्टडी सॉफ्टवेअर, लॉन्च इंडिया, इक्विटस मायक्रो फायनान्स, जिनियस कन्सल्टन्ट, चोला एमएस, आयएसटीसी, ग्रॅव्हिटी प्रा. ली., स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट, कोठारी कार्स, टाटा स्ट्राईव्ह एक्स्टेंशन, ई-ड्रीम्स टेक्नॉलॉजी, रॉयल एन्फिल्ड, नावाटा रोड ट्रान्सपोर्ट आदी कंपन्यानी सहभाग घेतला.

————————-
चौकट २
तरुणांसाठी आश्वासक संधी
देशातील उद्योग क्षेत्र कठीण काळातून जात असताना अशा प्रकारचा रोजगार मेळावा होणे आणि त्याला हजारो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग मिळणे, ही आश्वासक संधी आहे. राज्याच्या विविध भागातून, तसेच बाहेरूनही विद्यार्थी आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या आणि नोकरी हवी असलेल्या तरुणांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून एकत्र आणण्याचा हा सूर्यदत्ता संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
– सचिन इटकर, सल्लागार, स्ट्रॅटेजिक फोरसाइट

————————-
चौकट ३
कंपन्या, तरुणांचा चांगला प्रतिसाद
कंपन्यांना चांगले मनुष्यबळ, तर विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या हव्या आहेत. या दोहोंमध्ये समन्वय घडवण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा आयोजिला. कमी कालावधीत नियोजन करूनही विद्यार्थ्यांचा आणि कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ४५ कंपन्या आणि एक हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. त्यांच्यात संवाद झाला. त्यातून अनेकांना नोकऱ्या मिळतील, याचे समाधान आहे.
– प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे.