एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम : डॉ. अशोक उईके

Share this News:

मुंबई, दि. 28/8/2019 : महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक सोसायटी नाशिक अंतर्गत सुरु असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

डॉ. उईके म्हणाले, सध्या सहावी इयत्तेपासून सुरु असलेला सीबीएसई अभ्यासक्रम पहिली इयत्तेतच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमाचे आकलन सोपे होणार आहे. सन 2019-20 या वर्षात पहिल्या टप्प्यात 16 व त्यानंतर उर्वरित एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासून वर्ग सुरु करण्यात येणार असल्याने प्रत्येक वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देणे शक्य होणार आहे. पहिली इयत्तेपासूनच आदिवासी विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटा अधिक सुकर होणार आहेत. शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी या शाळेतील शिक्षक भरती प्रक्रिया काटेकोर होण्यासाठी नामवंत शिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर एकलव्य निवासी शाळा सुरु केल्या. 2001 ते 2019 पर्यंत 25 एकलव्य निवासी शाळा सुरु असून इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) या अभ्यासक्रमाचे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भोजन, निवास व्यवस्था, अंथरूण, वह्या पुस्तके, गणवेश, लेखन साहित्य शासनामार्फत मोफत पुरवण्यात येतात. नाशिक, नागपूर, अमरावती, पालघर, गडचिरोली,नंदुरबार, गोंदिया, धुळे, नांदेड, ठाणे, चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यात एकलव्य निवासी शाळा सुरु आहेत. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा कल असलेले अनेक विद्यार्थी इयत्ता सहावीपासून एकलव्य निवासी शाळेत प्रवेश घेतात. मात्र पहिलीपासून मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर या विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सीबीसीई अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देण्यात येत असल्याने त्यांना भाषेची अडचण येते. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा आणि या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर व्हावी या उद्देशाने एकलव्य निवासी शाळेत पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. दुर्गम भागात असणाऱ्या या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले चांगल्या दर्जाचे शिक्षक उपलब्ध होण्यासाठी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रे, विविध संकेतस्थळे, नामवंत राष्ट्रीय संस्था, विद्यापीठे येथे शिक्षक भरतीविषयी जाहिरात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शकपणे शिक्षक म्हणून निवड करण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीपासून उत्तम दर्जाचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे.

 

या पत्रकार परिषदेस आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा आदी उपस्थित होते.