राडारोड्याच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती द्या’

Share this News:

िंपरी, 9 सप्टेंबर 2019 – पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने अत्यंत चांगला असलेल्या बांधकाम राडारोड्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केली आहे. उलट्या पद्धतीने आधी कंत्राट नंतर धोरण मंजुरीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर केला आहे. या प्रकल्पाची सविस्तर माहिती भाजपचे नगरसेवक बाबू नायर यांनी महापालिकेकडे मागविली आहे.

याबाबत पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना पत्र दिले आहे. त्यात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, राडारोड्याचा प्रकल्प शहराच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्वपुर्ण आहे. 20 ते 25 वर्षासाठी हे धोरण असणार आहे. त्यामुळे त्याची सविस्तर माहिती नगरसेवकांना असणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन हवामान बदल मंत्रालयातर्फे बांधकाम साहित्य व राडारोडा यांच्यातील टाकाऊ घटकाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात कोणते निर्देश आहेत. महापालिकेचे धोरण काय आहे?, महासभा, स्थायी समिती सभेच्या मान्यतेचा ठराव, निविदेची नोटीस, त्यातील अटी-शर्ती, किती निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी किती निविदा पात्र झाल्या. कोणता ठेकेदार पात्र झाला आहे. पुन्हा महासभेसमोर धोरण का आणले?, त्याची सविस्तर माहिती नगरसेवक नायर यांनी निवेदनातून मागविली आहे.

त्याचबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि शहराचे पर्यावरण चांगले रहावे यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने मागील पाच वर्षात कोणते उपक्रम राबविले आहेत. त्याचीही माहिती नायर यांनी मागविली आहे.