महापुरातील ‘प्रकाशदूत’

Share this News:

22/8/2019, महापुराच्या उरलेल्या खाणाखुणा प्रत्येकाचे मन विदीर्ण करणाऱ्या असतात. सर्व काही डोळ्यादेखत वाहून गेलेले असते. उरतो फक्त अंधार. पण या अंधारालाही भेदून काढणाऱा एक आधार असतो माणुसकीचा. महापुरात बचाव कार्य करणारे, प्राण वाचविणारे आपले देवदूतासम जवान असोत किंवा स्थानिक नागरिक. जलतांडवातून उद्ध्वस्थ झालेल्या लाखोंचे संसार सावरण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटतो. गावागावातून पूरग्रस्त बांधवांसाठी तातडीने मदतकार्य सुरु होते. अनेक संस्था, संघटना स्वयंस्फूर्तीने पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरु करतात. यासोबतच अशा आपात्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणेमधील अधिकारी, कर्मचारी हे पूरग्रस्त बांधवांसाठी रात्रंदिवस अविश्रांत आपापल्या जबाबदाऱ्यांची कामे करतात. या सर्व एकजुटीच्या प्रयत्नांतून महापुराच्या प्रलयामध्ये सर्व काही गमावलेल्या पूरग्रस्तांना नवी भरारी घेण्याची, नव्याने आयुष्य फुलविण्याची उमेद मिळते. आधार मिळतो.

आपत्ती निवारणाच्या कामामध्ये ‘प्रकाशाचे नाते’ अखंडित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महावितरणसाठी अधिकच खडतर असते. संततधार व मुसळधार पाऊस, पूरस्थिती, वादळ अशा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावरील वीज वितरण यंत्रणेला सर्वप्रथम फटका बसतो. वीजयंत्रणेचे दूरवर पसरलेले जाळे जमीनदोस्त होते. पुराच्या पाण्यात वीजयंत्रणा असलेली सावधगिरीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. वादळ, पूर, पाऊस ओसरल्यानंतर वीज खंडित असेल तर ती लवकरात लवकर सुरु करण्याची स्वाभाविक अपेक्षा व्यक्त केली जाते. कारण सर्व काही आता विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेकविध कामांसाठी किंवा जनजीवन सुरळीत करण्यासाठी विजेची नितांत आवश्यक असते. शुद्ध पाण्यासाठी विविध पाणीपुरवठा योजना, वैद्यकीय सेवेसाठी छोटी मोठी रुग्णालये, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, ठिकठिकाणचे तात्पुरते पुनर्वसन केंद्र, मोठमोठ्या सोसायट्या आदी अत्यावश्यक ठिकाणी वीजपुरवठ्याअभावी अडचणी येऊ शकतात. वादळ किंवा महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या वीजयंत्रणेची दुरुस्ती ही अतिशय आव्हानात्मक असते. त्यामुळे युद्धपातळीवर दुरुस्ती कामे करून तसेच पर्यायी व्यवस्थेतून अत्यावश्यक सेवेसाठी वीजपुरवठा सुरु करण्यास प्राथमिकता दिली जाते.

अत्यावश्यक वीजसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या महावितरणमधील अभियंते व जनमित्रांसाठी यंदाचा पावसाळा हा खऱ्या अर्थाने कसोटीचा व कर्तव्याची परीक्षा घेणारा ठरला आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, पुणे व सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस व विविध धरणांतून मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे प्रलयकारी पूरस्थिती होती. अशाही परिस्थितीत पुराने विस्कळीत झालेल्या वीजयंत्रणेमधून प्रामुख्याने कोल्हापूर व सांगलीमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्याची उल्लेखनीय कामगिरी महावितरणच्या ‘प्रकाशदूतां’नी म्हणजेच अभियंता व जनमित्रांनी केली आहे.

विजेची निर्मिती व त्यानंतर पारेषण, वितरण अशा तीन टप्प्यांत ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. दाटवस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम डोंगरदऱ्यांतील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-बेरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा प्रतीक्षा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या ‘प्रकाशदूतां’ची तारेवरची कसरत आणि धडपड ही पावसाळ्यात तर अधिकच आव्हानात्मक असते.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांना गंभीर पूरस्थितीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. अक्षरशः प्रलयकारी अशीच स्थिती होती. यासोबतच पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, ठाणे, पालघर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक भागात पुराचा मोठा फटका बसला. या महापुरात लाखो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. शेती, छोटे व्यवसाय, उद्योदधंदे बुडाले. हजारो कोटींची वित्तहानी झाली. सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात सुमारे 40 जणांचा मृत्यू झाला. हजारो मुकी जनावरे वाहून गेली. राज्यातील पूरस्थितीमुळे यंदा महावितरणचे सुमारे 525 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या यंत्रणेला मोठा तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्रात सुमारे 45 उपकेंद्रातील 750 कृषी व बिगरकृषी वीजवाहिन्यांवरील वीजयंत्रणेला फटका बसला. त्यामुळे सुमारे 23890 वितरण रोहित्रांमधून होणार वीजपुरवठा खंडित झाला किंवा पूरस्थितीमुळे बंद करावा लागला. शहरी व ग्रामीण भागातील सुमारे 4 लाख 50 हजार बिगरकृषी आणि 3 लाख 45 हजार कृषी अशा एकूण 7 लाख 95 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता.

महापुर ओसरताच त्या-त्या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तसेच वीजयंत्रणेची उभारणी करण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु झाले. सर्वाधिक गंभीर परिस्थिती असलेल्या कोल्हापूर व सांगलीमधील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला लागले. याशिवाय पुणे, बारामती, सातारा व सोलापूर येथील अभियंता व कर्मचारी तसेच कंत्राटदारांचे कुशल कर्मचारी यांचा समावेश असलेली 45 पथके या पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली. पूरग्रस्त भागात वीजयंत्रणा नेण्यासाठी इतर परिमंडलातून पॉवर ट्रॉन्सफॉर्मर, वितरण रोहित्रे, लोखंडी वीजखांब, वीजवाहिन्या, सिंगल फेज व थ्री फेजचे नवीन मीटर्स आदी साधनसामग्री कोल्हापूर व सांगलीकडे रवाना करण्यात आले. दुसरीकडे महापुराचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणच्या मुख्यालयात विशेष दैनंदिन सनियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे या कालावधीत दैनंदिन आढावा घेत होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू यांनी कोल्हापूरात येऊन वीजयंत्रणेची पाहणी केली. तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वीजसेवेसाठी अविश्रांत काम करणाऱ्या अभियंता, जनमित्रांना प्रत्यक्ष भेटून शाबासकी दिली. त्यांचे कौतुक केले. पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे हे सुद्धा आठवडाभर कोल्हापूर व सांगलीच्या भागात होते. पूरस्थिती ओसरल्यानंतर केवळ 5 ते 6 दिवसांत शहरी व ग्रामीण भागातील सर्वच 4 लाख 50 हजार बिगरकृषी ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. अनेक पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, बसस्थानके, अग्निशामक दल, तात्पुते पुनर्वसन केंद्रांना प्राधान्यांना पर्यायी व्यवस्थेतून किंवा वीजयंत्रणेची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. सुमारे 2 लाख कृषिपंपाचाही वीजपुरवठा सुरु झाला आहे. महापूर ओसरल्यानंतर लगेचच वीजपुरवठा सुरु करण्याचे जे यशस्वी प्रयत्न केले त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, संस्थांनी लेखी पत्र देऊन महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महावितरणने वीजपुरवठ्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

कोल्हापूर व सांगलीमध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात बोटीने जाऊन अभियंते, जनमित्रांनी वीजयंत्रणेच्या दुरुस्तीची कामे केली. चिखल व निसरडे रस्त्यातून तसेच गुडघाभर पाण्यातून वाट शोधत विद्युत साहित्य नेण्यात आले. वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली. सर्व प्रकारचे धोके टाळून ही कामे करण्यात आली. खरेतर महापुरानंतर आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो. विविध आजार पसरण्याची शक्यता असते. सर्वत्र दुर्गंधी असते. याशिवाय प्रत्यक्ष काम करताना अनेक प्रकारचे विविध धोके असतात. परंतु महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत प्रयत्नांतून महापुरामुळे आलेले अंधाराचे साम्राज्य नाहिसे करण्याचे अभिमानास्पद काम केले आहे. रोगप्रतिबंधक लसी टोचून अभियंता, अधिकारी व कर्मचारी कर्तव्यनिष्ठेने आपआपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीशी अहोरात्र झुंजत होते, सणासुदीचे दिवस असताना सुद्धा कोल्हापूर व सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी महावितरणच्या जिगरबाज अभियंता व कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन सेवा दिली आहे. आपत्तीच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले. आपात्कालिन परिस्थितीमध्ये साधनसामग्रीसह प्राधान्यपर कामांचे अचूक नियोजन, कुशल मनुष्यबळ आणि वीजपुरवठा सुरु करण्यासाठी एकजुटीने केलेले शर्थीचे प्रयत्न या बळावर महावितरणने कमीत कमी वेळेत वीज पुरवठा सुरळीत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वीजपुरवठा खंडित झाला की तक्रारकर्ते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात. पण त्यादरम्यान महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसे काम करावे लागते, याची माहिती बऱ्याचदा नसते. पण वीज अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वीजसेवा देण्याची धडपड आणि अविश्रांत प्रयत्न समजून घेतले तर या ‘प्रकाशदूतां’च्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना निश्चितच न्याय मिळेल.