अण्णाभाऊंची जन्मशताब्दी समाजपरिवर्तन वर्ष म्हणून साजरे करणार : हनुमंत साठे

Share this News:
पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य झिजवले. मातंग समाजासह इतर वंचित समाजाच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून, वाणीतून मांडल्या. आजही मातंग, दलित समाज मागासलेला आहे. समाजाचे परिवर्तन करण्यासाठी अण्णाभाऊ यांची जन्मशताब्दी सामाजिक परिवर्तन वर्ष म्हणून साजरी करणार आहे,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी प्रारंभी त्यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सारसबाग परिसरात पक्षाच्या वतीने झालेल्या अभिवादन महासभेत हनुमंत साठे बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेविका सोनाली लांडगे, महाराष्ट्राचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हनुमंत साठे म्हणाले, “देशातील विविध समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना अजूनही मातंग समाज पाठीमागे राहिलेला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे विविध प्रश्न सोडविले पाहिजेत. तसेच समाजातील व्यक्तींनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचून त्यांचे विचार अमंलात आणले, तर समाज प्रगती करेल. समाजाच्या विकासासाठी महामंडळाला भरघोस निधी सरकारने द्यावा. कर्जवाटप लवकरात लवकर सुरु करावे. तसेच समाज घडविण्याचे काम करणाऱ्या अण्णाभाऊंना भारत सरकारने भारतरत्न सन्मान द्यावा.”
परशुराम वाडेकर म्हणाले, “साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या उत्साहात साजरी करतो. परंतु त्यांचे विचार अंमलात आणत नाही. जोपर्यंत त्यांचे विचार कार्यकर्त्यांना समजणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. त्यामुळे अण्णाभाऊ समजून घ्यायला हवेत. अण्णाभाऊच्या प्रत्येक कादंबरीत महिला नायिका होती. कारण पुरुषाबरोबर महिलेलादेखील समान हक्क मिळाला पाहिजे, ही त्यांची भावना होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनीतून आणि भाषणातून आवाज उठवला होता.”
अशोक कांबळे म्हणाले, “रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत. त्यामध्ये अण्णाभाऊंचे साहित्य आणि त्यांचा जीवनप्रवास तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.” बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. महिपाल वाघमारे व बाबुराव घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा कांबळे यांनी आभार मानले.