ऑपरेशन विजय हा शौऱ्याचा अभिलेख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share this News:

मुंबई, दि. 26 : भारताने कधीच कोणत्या देशावर हल्ला नाही केला पण जर कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर आपल्या भारतीय सैनिकांमध्ये  हा हल्ला परतवून लावण्याची ताकत आहे. ऑपरेशन विजयमध्ये पाकिस्तानला वाटले होते की भारतीय सैनिक त्यांच्यापर्यंत पोहचू शकणार नाहीत, पण भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ऑपरेशन विजय यशस्वी केले. त्यामुळेच ऑपरेशन विजय हा शौऱ्याचा अभिलेख आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

अर्थव फाऊंडेशन यांच्या मार्फत षण्मुखानंद हॉल येथे कारगिल विजय दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार राज पुरोहित, लेफ्टनंट जनरल एस. के. पराशर, विंग कंमाडर जगमोहन नाथ, सनदी अधिकारी संजय भाटिया, ऑपरेशन विजय मध्ये हौतात्म्य आलेल्यांचे कुटुंबिय/ नातेवाईक उपस्थित होते.

कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा उपस्थित मान्यवरांना देताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले,  देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजयाला २० वर्ष पूर्ण होत असून आपल्या भारतासाठी आज गौरवाचा दिवस आहे. आजच्या दिवशी ऑपरेशन विजय मध्ये शहीद झालेल्या शहिदांचे बलिदान आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपले भविष्य सुरक्षित राहावे म्हणून या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भारतासाठी जसे संसाधन आवश्यक आहे तसेच आपल्या देशाची सेना मोठी असणे आवश्यक आहे. कोणतीही परिस्थिती काही असो आपल्या देशाच्या जवानांनी आपला देशाचा तिरंगा नेहमीच उंच फडकत ठेवला आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासाकडे वाटचाल करत आहे. पण आपण हा विकास आपला देश सुरक्षित आणि बलशाली आहे म्हणून करू शकलो आहोत.

शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ

भारताने नेहमी त्याग आणि वीरता दाखवली असून भारतीय सैनिक सुद्धा त्याग आणि वीरतेचे काम करतात म्हणून महाराष्ट्र शासन या सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. आपल्या सर्वांची सैनिकांप्रती कर्तव्यभावना असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ही मदत  ५ लाख रुपयांवरून एक कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. आपण सर्वानी एक लक्षात ठेवले पाहिजे, आपण आपल्या सैनिकांना हा विश्वास दिला पाहिजे की, १२५ कोटी जनता त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे.  महाराष्ट्र शासनामार्फत शहीद कुटुंबियांना २ एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जमीन खरेदीवर स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. हा निर्णय दोन वर्षांपासून घेण्यात आला आहे. राज्य शासनाने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी शहीद कुटुंबियांना सन्मानपूर्वक शासकीय कार्यक्रमांना बोलवण्याची पद्धत सुरु केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अथर्व फाऊंडेशनमार्फत कारगिल विजय दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान ऑपरेशन विजयबाबत लघुपट दाखविण्यात आला. आपल्या प्रास्ताविकेत सुनिल राणे यांनी अथर्व फाऊंडेशन शहीद कुटुंबियांसाठी करीत असलेल्या कामाबाबत माहिती दिली. फाऊंडेशनच्या  वर्षा राणे यांनी उपस्थित शहीद कुटुंबियांचा सत्कार यावेळी केला.