Fire Brigade rescue 6 persons caught in heavy rain, vehicle stuck

Share this News:

अग्निशमन दलाचे जवान आमच्यासाठी “हिरोच”

पुण्यातील बाणेरस्थित कुंटूबाने केले जवानांचे कौतुक

पुणे – काल शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पाषाण सर्कलजवळ बाणेरमधील रहिवाशी कुटूंब डॉ. नंदिनी शेटे यांची महिंद्रा एसयूव्ही-५०० हि कार फुटपाथजवळील खड्ड्यामधे अचानक अडकली. भर पावसात व अंधारात अचानक घडलेल्या या घटनेने गाडीत असणारे दोन पुरुष दोन महिला व दोन लहान मुले धास्तावले. गोव्यावरुन पुण्याकडे परतत असताना अगदी घराजवळच हा प्रसंग ओढवला. गाडीतील कुंटूब धास्तावलेले असून गाडी अडकली असल्याचे तेथून जाणाऱ्या अग्निशमन वाहनातील दलाच्या जवानांनी पाहिले. दलाचे जवान पाषाण तळ्यात बुडीत वर्दिचे दिवसभर शोधकार्य घेऊन येत होते. पाऊस सुरु असताना वाहतूक जास्त असूनदेखील आपल्या कर्तव्याचे भान राखून जवानांनी त्या दिशेने अग्निशमन वाहन वळवून त्यांच्या मदतीला धावले.

जवानांनी तिथे धास्तावलेल्या कुटूंबाला प्रथम धीर देऊन गाडी कशी अडकली आहे याचा अंदाज घेतला. तर गाडी फुटपाथ लगत असणाऱ्या खड्ड्यामध्ये मागील बाजूने किमान दहाबारा इंच खाली अडकली आहे. जवानांनी तातडीने अवघ्या पाचच मिनिटात ताकदीने गाडी उचलत बाहेर काढून आपली कामगिरी चोख बजावली. गाडी व कुटूंब सुखरुप असल्याची खात्री करुन जवान निघणार तोच डॉ. नंदिनी शेटे व त्यांचे पती महेश यांनी जवानांना न बोलवता फक्त रस्त्यात कोणी अडचणीत आहे हे पाहून ते लगेचच मागे आले त्याबद्दल कौतुक करुन तुम्ही जवानच खरे “हिरो” असल्याची भावना व्यक्त केली. एवढेच नाही तर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला व दलाचे मुख्य अधिकारी मा. रणपिसे यांना फोनवरुन घटनाक्रम सांगून त्यांचे ही आभार मानले व कर्तव्याला सलाम केला.

सदर कामगिरीमधे दलाचे जवान चंद्रकांत आनंदास, शशि पवार, छगन मोरे, योगेश पिसाळ, आझीम शेख, निलेश माने, कैलास आखाडे, संदिप घडशी तसेच अग्निशमन चालक युवराज जाधव व देशमुख यांचा सहभाग होता.