Watchman brutally kills dog in Pune

Share this News:

वॉचमनने केलेल्या मारहाणीत निरागस कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू

प्राण्यांशी निर्दयपणे वागणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी; प्राणी सेवा संस्थेचे अमित शहा, रुपाली रेवतकर यांची मागणी

पुणे : उंड्रीतील कडनगर चौक येथील सिल्व्हर लीफ सोसायटीच्या  सुरक्षारक्षकाने केलेल्या मारहाणीत तीन महिन्याच्या कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणी सेवा संस्थेच्या रुपाली रेवतकर यांनी गुन्हा दाखल केला असून, सुरक्षारक्षकास अटक करण्यात आली आहे. कुमार अशोक कुंभार (वय ३० वर्षे, रा. सिल्व्हर लीफ सोसायटी, कडनगर चौक, उंड्री, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. दरम्यान, प्राण्यांना निर्दयपणे मारणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणी सेवा संस्थेचे अमित शहा आणि रुपाली रेवतकर यांनी केली आहे. 


याबाबत माहिती देताना अमित शहा म्हणाले की, “दि. १ मे २०१७ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सिल्व्हर लीफ सोसायटीच्या आवारात एका कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज शेजारच्या सोसायटीत राहणार्‍या रुपाली रेवतकर यांना ऐकायला आला. त्या दिशेने रुपाली रेवतकर गेल्या असता, सुरक्षारक्षक काठीने त्या कुत्र्याच्या पिल्लास मारत असल्याचे व पायाला धरुन घसटत ओढत नेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सुरक्षारक्षकाला मारहाणीबाबत जाब विचारला असता सोसायटीच्या आवारात कुत्र्याने घाण केली असल्याचे त्याने सांगितले. कुत्र्याला मारहाण करु नये, असे सांगितल्यानंतर रागाच्या भरात सुरक्षारक्षकाने रुपाली रेवतकर यांच्या पायावर काठी मारली व शिविगाळ करण्यास सुरुवात केली. शिवाय, जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा कुत्र्याला मारहाण सुरु केली. त्यानंतर रुपाली यांनी मला फोन केला. आम्ही दोघांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन याबाबत माहिती दिली.”

 

रुपाली रेवतकर म्हणाल्या, “पोलिस आल्यानंतर कुत्र्याच्या पिल्लास मी माझ्या सोसायटीच्या आवारात घेऊन गेले. त्यानंतर पोलिसांनी सदर घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केला. कुत्र्याच्या पिल्लास निर्दयपणे मारहाण करुन त्याच्या मत्यूस कारणीभूत ठरलेल्या व मला शिविगाळ करीत पायावर काठी मारुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या क्रूर सुरक्षारक्षकास कठोर शिक्षा द्यावी.”


कोंढवा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन सदरविषयी कुमार अशोक कुंभार याचावर गुन्हा दाखल केला आहे. प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायदा १९६० आणि भारतीय दंड संहितानुसार कलम ३२४, ५०४ ५०६ अन्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर या कुत्र्याचा अंत्यविधी प्राणी सेवा संस्थेने केला. प्राण्यांवर अशा प्रकारे निर्दयपणे अत्याचार करण्यांना चाप बसला पाहिजे. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.