बोपखेल ग्रामस्थांच्या रस्त्यासाठी आमदार जगताप यांचे संरक्षणमंत्र्यांना साकडे

Share this News:
>> आमदार जगताप यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची दिल्लीत घेतली भेट 
>> साई चौकातील वीजवाहिन्या लष्कर हद्दीत स्थलांतरित करण्यास संरक्षणमंत्र्यांची मंजुरी
पिंपरी, दि. ८ – बोपखेल ग्रामस्थांसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच पिंपळेसौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची बुधवारी (दि. ८) दिल्ली येथे भेट घेतली. यासंदर्भात महिनाअखेरपर्यंत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले आहे. तसेच औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर पिंपळेनिलख, साई चौक येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या सहा उच्चदाब वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतर करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली. त्याला संरक्षणमंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली. त्यामुळे साई चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 
 
यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार,  शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे, सरचिटणीस प्रमोद निसळ  उपस्थित होते. बोपखेल ग्रामस्थांच्या दळवळणासाठी मुळा नदीवर तात्पुरता तरंगता पूल उभारण्यात आला होता. मात्र तो पावसाळ्यात धोकादायक ठरणार असल्याने लष्कराने सोमवारी (दि. ७) हा पूल काढून टाकला. त्यामुळे बोपखेलमधील नागरिकांना १८ ते २० किलोमीटर वळसा घालून पिंपरी-चिंचवडशी संपर्क करावा लागत आहे. नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी महापालिका व लष्कराने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
 
त्यामुळे आमदार जगताप यांनी बोपखेल ग्रामस्थांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे बुधवारी धाव घेतली. दिल्ली येथे संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन बोपखेल ग्रामस्थांना दळणवळणासाठी होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली. तसेच कुंभमेळ्याच्यावेळी गंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या धर्तीवर बोपखेलच्या नागरिकांसाठी मुळा नदीवर पाँटून पूल तातडीने उभारण्याची मागणी संरक्षणमंत्र्याकडे केली. हा पूल उभारला जात नोही, तोपर्यंत सीएमईच्या हद्दीतून जाणारा जुना रस्ता बोपखेल ग्रामस्थांसाठी खुला करण्यात यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्याकडे केली.
 
याशिवाय पिंपळेसौदागर येथील लष्कराच्या हद्दीतून जाणारा रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता बंद केल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणीही आमदार जगताप यांनी संरक्षणमंत्री यांच्याकडे केली. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी बोपखेलवासीयांसाठी पर्यायी रस्ता आणि रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्त्याबाबत या महिनाअखेरपर्यंत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे जगताप यांनी सांगितले. औंध-रावेत बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख, साईचौक येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सहा उच्चदाब वीजवाहिन्या अडथळा ठरत आहेत. या वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतरित केल्यास उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे. 
 
या सहा वीजवाहिन्या स्थलांतरित करण्यास मान्यता देण्याची मागणी आमदार जगताप यांनी संरक्षणंत्री पर्रीकर यांच्याकडे केली. ही मागणी त्यांनी तातडीने मान्य करून वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतरित करण्यास मंजुरी दिल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडलेल्या साई चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळेल, अशी आशा आमदार जगताप यांनी व्यक्त केली आहे.